अपूर्णांकांची औपचारिक ओळख करून देताना (अपूर्णांक लिहायला, वाचायला शिकवताना) आपण काय भाषा वापरतो हे फारच महत्त्वाचे आहे.
२/५ म्हणजे एका वस्तूचे पाच भाग केले आणि त्यांपैकी दोन घेतले, तर त्या दोन भागांना २/५ म्हणायचे, अशी भाषा सामान्यपणे वापरली जाते. यात गणिताच्या दृष्टीने काहीच चूक नाही. मात्र पुढे अंशाधिक अपूर्णांक शिकताना मुलांना या भाषेचाच अडसर कसा होतो, हे लक्षात आले.
२/५ म्हणजेच पाच भागांपैकी दोन भाग हे मुलांच्या डोक्यात पक्के बसते. त्यामुळे ७/५ असा अपूर्णांक असणारच नाही असे त्यांना वाटते. त्यांचा प्रश्न साधा असतो. पाचच भाग केले, तर त्यांतील सात भाग कसे घेणार ?
म्हणजे मुले जी मर्यादित संकल्पना शिकलेली असतात, तिचा विस्तार करणे त्यांना अवघड वाटते.
या प्रश्नावर उपाय म्हणून मला एक अभिनव पद्धत एका पुस्तकात वाचायला मिळाली. या पुस्तकात एका पूर्णाकृतीचे दोन, तीन, चार, पाच, सहा असे समान भाग केलेले दाखविलेले होते आणि दोन सारखे भाग केले तर एका भागाला १/२ म्हणावे, तीन सारखे भाग केले तर एका भागाला १/३ म्हणावे अशी अपूर्णांकांची ओळख करून दिली होती. म्हणजे प्रथम ‘अंश एक’ असणार्या अपूर्णांकांचीच ओळख करून दिली होती.
यानंतर २/३ म्हणजे १/३ दोन वेळा घेतले, ४/५ म्हणजे १/५ चार वेळा, ४/३ म्हणजे १/३ चार वेळा अशी अपूर्णांकांची ओळख करून दिली होती.
मी ही पद्धत माझ्या शाळेत वापरली आणि ही खूपच प्रभावी असल्याचे माझ्या लक्षात आले. “त्यांपैकी” हा शब्द टाळून अपूर्णांकांची ओळख करून दिल्याने अंशाधिक अपूर्णांक शिकताना येणारी अडचण सहज टळू शकते हेही माझ्या लक्षात आले.
***************
वरील उतारा ज्या लेखातून घेतला आहे तो लेख क्वेस्ट ह्या संस्थेच्या संकेतस्थळावर आहे. हा लेख जरूर वाचा. त्यासाठी खालील दुवा पहा-
मुलांचे गणित शिक्षण : काही अनुभव
-नीलेश निमकरसंचालक, क्वेस्ट.
प्राथमिक पातळीवरील गणित कठिण जाण्यच्या विवध कारणांपैकी एक म्हणजे ते केवळ आकड्यांनीच समजवण्याचा प्रयत्न केला जातो.त्याची व्.वहाराशी सांगड घातली जातेच असं नाही. तेव्हा तसं केल्यानं एक अडचण दूर होईल.
ReplyDeleteमनोहर राईलकर
१-५-२०१४