बहुतेक जणांनी पाहिलेल्या चंद्रग्रहणात चंद्राचा रंग काळसर तपकिरी असतो.
शनिवारी (१९ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी दिसणा-या चंद्रग्रहणात मात्र चंद्र काळसर तपकिरी दिसणार नाही तर त्याचा प्रकाश थोडा फिकट झालेला दिसेल. ह्याचे कारण समजावून घेऊ.
सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आली व हे तिन्ही गोल एकाच सरळ रेषेत आले तर पृथ्वीची दाट सावली चंद्रावर पडते. अशावेळी पृथ्वीवरून बघणा-या व्यक्तीला जे चंद्रग्रहण दिसते त्यात चंद्र काळसर तपकिरी रंगाचा दिसतो.
सूर्यामुळे पृथ्वीची जशी दाट सावली पडते तशीच दुसरी एक विरळ सावलीही पडते. ही सावली विरळ असते कारण त्या भागात सूर्याचा प्रकाश पूर्णपणे अडवला जात नाही.
सूर्याकडून पृथ्वीवर पडणा-या अनेक प्रकाशकिरणांपैकी वरच्या टोकाकडून येणारे दोन व खालच्या टोकाकडून येणारे दोन अशा चार प्रकाशकिरणांचा प्रवास लक्षात घेऊ. खालील आकृती पहा.
पृथ्वीच्या मागे जिथे सूर्याकडून येणारा कोणताही प्रकाशकिरण पोचत नाही त्या भागात दाट छाया तयार होते. ज्या भागात सूर्याचे काही किरण अडतात पण इतर काही किरण पोचतात तिथे सावली विरळ असते व पडछाया तयार होते.
सूर्यप्रकाशामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे वापरून सावल्यांचे प्रयोग करा. एखाद्या वस्तूच्या अशा दोन सावल्या दिसतात का ते पहा. आकाशात उडणा-या पक्षाची सावली जमिनीवर का पडत नाही हे अशा प्रयोगांवरून समजून घेता येईल का?
१९ ऑक्टोबरच्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या पडछायेतून जाईल. दाट छायेतून जाणार नाही. त्यामुळे तो थोडा फिकट व थोडा लालसर होईल पण काळसर तपकिरी होणार नाही. चंद्राच्या रंगातील असा बदल थोड्या बारकाईने बघितल्यावर लक्षात येईल.
अशा ग्रहणाला मराठीत छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात. १९ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी हे चंद्रग्रहण बघता येईल.
इंग्रजीत दाट सावलीला अंब्रा (umbra) आणि विरळ सावलीला पेनंब्रा (penumbra) म्हणतात. तसेच चंद्रग्रहणाला लुनर एक्लिप्स (lunar eclipse) म्हणतात.
छायाकल्प चंद्रग्रहणाला इंग्रजीत पेनंब्रल लुनर एक्लिप्स (Penumbral Lunar Eclipse) म्हणतात. हे चंद्रग्रहण पृथ्वीवरून,चंद्रावरून व सूर्यावरून कसे दिसत असेल ह्याचे कल्पनाचित्र खालील दुव्यावर दाखवलेले आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.